Video Viral : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनचे पंचाशी गैरवर्तन


अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिगमध्ये केलेल्या असभ्य वर्तनावरुन सध्या सर्वच स्तरावरुन टीका केली जात आहे. सामन्यादरम्यान अंपायरच्या नॉट आऊटच्या निर्णयावर शाकिब अल हसनने नाराजी व्यक्त स्टंपवर लाथ मारली आणि नंतर ते सर्व स्टंप्स काढून फेकून दिले. अंपायरनी पायचीताच्या अपीलवर नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबने हे कृत्य केले. शाकिब हसनचा हा व्हिडीओ त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.


हा सर्व प्रकार बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिग टी-२० स्पर्धेदरम्यान घडला. मोहमद्दन स्पोर्टिंग क्लब आणि अबाहानी लिमिटेड या दोन संघादरम्यान सामना सुरु होता. अबाहानी लिमिटेडच्या मुश्फिकुर रहीम याच्याविरोधात मोहमद्दन स्पोर्टिंगचा खेळाडू शाकिब हसनने पायचीताचे अपील केले. अंपायरनी त्यावर नॉट आऊटचा निर्णय घेतला. शाकिबने अंपायरच्या या निर्णयावर त्यांच्याशी वाद घातला आणि स्टंपवर लाथ मारली.


या सामन्याचा आणखी एका व्हिडीओमध्ये शाकिबला अंपायरने नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर संताप अनावर झाल्याचे दिसत आहे. नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबने अंपायरशी वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात शाकिबने तिनही स्टंप्स काढून टाकले आणि ते पीचवर फेकले. शाकिबच्या कृतीमुळे आता सोशल मीडियामध्ये त्यावर टीका केली जात आहे. कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणीदेखील क्रिकेट चाहत्यांनी बांग्लादेश क्रिकेट बोर्डकडे आणि आयसीसीकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांची शाकिब हसनने माफी मागितली असून अशा पद्धतीची घटना यापुढे पुन्हा होणार नसल्याचे शाकिबने सांगितले आहे.