अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत खुलासा


मुंबई – देशातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेले असताना, या भेटीबाबत आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी देण्यात आली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे? याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.

शरद पवारांची देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. शरद पवार पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये जाणार होते, पण त्यांना तब्येतीमुळे जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. एक सशक्त मोर्चा भाजपच्या विरोधात काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात तसा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केले होते. त्यानंतरही शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. २०२४ मध्ये भाजपला विरोधकांकडून तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे.