महाराष्ट्र चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारे एकमेव राज्य


मुंबई – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार युट्यूब चॅनेल सुरु केल्याची माहिती ट्विट करत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा लवकरच युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. त्याचबरोबर लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. आता जिओ टीव्ही वर इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य असून ज्याने चार माध्यमांचे शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.

वर्षा गायकवाड यांनी त्याआधी ट्विट करून ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक जाहीर केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. पण स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागाने अशा भागात ऑनलाईन पद्धतीने शिकवणी वर्ग घेण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर आता शिक्षण विभागाकडून बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेले वेळापत्रक

  • पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. प्रत्येक दिवशी याचा कालावधी ३० मिनिटांचा असणार आहे. पालकांशी या वर्गांमध्ये संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
  • पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटे विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.
  • तिसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे.
  • नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.