व्हायरल; केंद्रीय मंत्री म्हणतात, भाभीजी पापड खा आणि कोरोना पळवा


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात एकीकडे देशातील शास्त्रज्ञ कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याच्या अहोरात्र प्रयत्न करत असतानाच देशातील स्वयंघोषित शास्त्रज्ञ कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाय सुचवत आहेत. त्यात आता आणखी एका शास्त्रज्ञांची भर पडली आहे.

केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी चक्क कोरोनाशी लढा देणारे आणि शरीरात अँटीबॉडीज तयार करणारा एक पापड लाँच केला आहे. सध्या सोशल मीडियावर या केंद्रीय मंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी हा पापड खा आणि कोरोना पळवा असा दावाच केला आहे. आता केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्यामुळे मोदी सरकार अडचणीत येऊ शकते.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिले आहे. त्या पापडाच्या ब्रँडचे भाभीजी पापड असे नाव असून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत हा पापड बनविल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पापडावरून मेघवाल यांची सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जात आहे. हा पापड असताना कोरोनाच्या लसीची काय गरज आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारत आहेत.