
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसूल मिळावा म्हणून वाईन शॉप सुरु करा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या मागणीला विरोध केला आहे. राज्य सरकारने दारूच्या पैशातून महिलांचा शाप मिळणारा महसूल लॉकडाऊन परिस्थितीत स्वीकारू नये, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
दारुच्या पैशातून मिळणारा महसूल राज्य सरकारने स्वीकारु नये
राजसाहेब…महसूल निर्माण करता येईल आणि राज्याचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर आणता येईल, पण महिलांचे शाप मिळणारा महसूल वाईन शॉपमधून सरकारला मिळतो. एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत. राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान, या दारुमुळेच अनेक महिलांचा संसार उध्वस्त झाला आहे. दारूची दुकाने सरकारने सुरू करू नये एवढीच सर्वसामान्यांच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांना आमची विनंती राहील, असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
