मार्च-एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ


मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या घरगुती, व्यावसायिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन केल्यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीजबिल प्राप्त होईल.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेप्रमाणे मार्च महिन्याचे बिल भरण्यास महावितरणने 15 मे 2020 तर एप्रिल-2020 चे वीजबिल भरण्यासाठी 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 22 मार्च ते 30 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे. सोबतच वीजबिलांची छपाई व वितरण देखील बंद करण्यात आले आहे. तसेच वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. तथापि, महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपमधील लॉगिनद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे असा ‘एसएमएस’ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील 2 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठवण्यात येत आहे.

मीटर रीडिंग वीजग्राहकांनी स्वत:च घेऊन पाठवल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जे ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठवणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठवण्यात येईल. पुढील कालावधीत महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर या ग्राहकांना अचूक वीजबिल आकारण्यात येईल व मागील सरासरी वीजबिलांचे समायोजन करण्यात येणार आहे.

मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘लॉकडाऊन’मुळे ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठवण्यात येत आहे. त्याचबरोबर वीजबिल वेबसाईट व मोबाईल ॲपवर पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.

Leave a Comment