रेड झोन वगळता अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना


मुंबई : 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृतिदलाची सोमवारी मंत्रालयात त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे.

सुभाष देसाई यांनी यावेळी मुंबई-पुणे यांसारख्या तीव्र कोरोनाबाधित क्षेत्रांना वगळून इतर जिल्ह्यातील उद्योगांना काही नियंत्रणांसह उत्पादन सुरू करता येईल, यावर प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिल्या आहेत. विशेषत: शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल. त्याचबरोबर यावेळी कायमस्वरुपी तसेच कंत्राटी कामगारांना काही प्रमाणात उत्पन्न मिळावे हा दृष्टीकोन प्राधान्याने पुढे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी केंद्राकडे करावयाच्या मागण्यांवरही चर्चा झाली.

लघुउद्योगांना त्यांच्या कामगारांना किमान दोन महिने पगार देता यावा, यासाठी बँकांनी कर्जांची मर्यादा वाढवून दिली पाहिजे, याबाबत केंद्र शासनाने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील यंत्रणांनी वीज आणि पाण्याच्या प्रत्यक्ष वापराचं बिल आकारावीत, एमआयडीसीने विकास कालावधी किमान तीन महिने विनाशुल्क वाढवून द्यावा या विषयी चर्चा करण्यात आली. वरील सर्व गोष्टींना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंजुरीनंतरच मान्यता देण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment