यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासंदर्भात नागपूर जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण माहिती


नागपूर – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले असल्यामुळे नागपूरमधील दीक्षाभूमीवर दरवर्षी दसऱ्याला आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन यावर्षी करता येणार नाही.

जिल्हा प्रशासनाने आज या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये राज्य शासनाने मुद्दा क्रमांक 4 (xv ) अनुसार मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी 30 सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली. तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली.

राज्य सरकारने निर्गमित केलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. 15 ऑक्‍टोबर रोजी दीक्षाभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळणे, राज्य शासनाचे उपरोक्त निर्देश पाळणे शक्य नसल्याचे, सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा हा अभिवादन सोहळा, यावर्षी होऊ शकणार नाही, असे प्रशासनाने कळविले आहे.