किरीट सोमय्यांनी रामदास कदमांच्या मदतीनेच केला अनिल परबांचा गेम ? ऑडिओ क्लिपमुळे खळबळ


मुंबई – मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हात धुवून लागले आहेत. त्यांनी अनेक नेत्यांवर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. यापैकी बहुतेक नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली आहे. पण याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर येत असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यामागे लागलेल्या चौकशीच्या फेऱ्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता संपूर्ण माहिती माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातही रामदास कदम यांनीच सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हे आरोप केले आहेत. या संदर्भातील एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. तर रामदास कदम यांनी संजय कदम यांचे आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्यांचा संवाद आहे. अनिल परब यांचे वांद्र्यातील कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात येणार आहे. तसे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असा दोघांमधील संवाद आहे. या आदेशाची प्रत कधी मिळेल अशी विचारणा कर्वे करतात. त्यावर दोन दिवसांत मिळेल, असे उत्तर सोमय्यांनी दिले आहे.

यानंतर कर्वे हे संभाषण रामदास कदमांच्या कानावर घालतात. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अनिल परबांना राजीनामा द्यावा लागेल, असे कदम म्हणतात. या ऑडिओ क्लिप मनसेचे नेते आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुढे आणल्या आहेत.