जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीवर कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप


जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जेफ बेझोस यांच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे. बेझोस यांच्यावर आणि कंपनीवर त्यांच्या कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीकडून 12 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या अंतराळ मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधीच कर्मचाऱ्यांच्या गंभीर आरोपांमुळे जेफ बेझोस अडचणीत आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते ब्लू ओरिजिनमधील वातावरण अत्यंत खराब झाले आहे.

स्पेस एक्सचे मालक एलन मस्क आणि व्हर्जिन गॅलेक्टिकचे संस्थापक रिचर्ड ब्रेन्सन यांना मागे टाकण्यासाठी बेझोस स्पर्धा करत असल्यामुळे ते कर्मचाऱ्यांना नव्हे, तर केवळ कंपनीला प्राधान्य देतात. यामुळे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे. कंपनीच्या माजी कर्मचारी संपर्क प्रमुख अलेक्झांड्रा यांनीही हा मुद्दा ठळकपणे मांडला.

त्या या प्रकरणी म्हणाल्या की- पुरुषांना स्पेस कंपनीमध्ये प्राधान्य दिले जाते. याठिकाणी महिला सुरक्षित नाहीत. महिला कर्मचारी दिवसागणिक लैंगिक छळाच्या शिकार बनत आहेत. महिलांना ‘बेबी गर्ल’, ‘बेबी डॉल’ किंवा ‘स्वीटहार्ट’ अशी हाक मारली जाते. कंपनीचे मोठे अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक वेळेविषयी विचारत राहतात. त्याचबरोबर असा देखील आरोप केला जात आहे की जेफ बेझोस यांच्या कंपनीमध्ये महिलांचे मत देखील विचारात घेतले जात नाही.

अलेक्झांड्रा यांनी सांगितले की नासाच्या माजी अंतराळवीरांना ब्लू ओरिजिनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तुम्ही स्त्रियांऐवजी माझा सल्ला घ्या, कारण मी एक पुरुष आहे आणि महिलांपेक्षा चांगले मत देऊ शकतो. दरम्यान ब्लू ओरिजिनच्या प्रवक्त्याने हे आरोप नाकारले आहेत. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, दोन वर्षांपूर्वी कंपनीतून अलेक्झांड्राना काढून टाकण्यात आले आहे.

ब्लू ओरिजिनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध भेदभाव किंवा छळाची अशी कोणतीही घटना नाही. हे सर्व टाळण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना हॉटलाइनची सुविधा दिली आहे. ही हॉटलाइन 24 तास सुरू असते. तक्रार प्राप्त होताच कंपनी कारवाई देखील करते.