डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा!


नवी दिल्ली – एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागलेला असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिस पाठोपाठ Delta Plus या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. सध्या देशात विषाणूच्या या प्रकाराचे फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा यामध्ये समावेश आहे. या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतासह जगातील एकूण ८० देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट सापडला आहे. पण, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण भारतात सापडले आहेत. पण, महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये या २२ पैकी १६ रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी आढावा घेणाऱ्या INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomic Consortia) या गटाच्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे.

या तीनही राज्यांना यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला आहे की या व्हेरिएंटविषयी स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. या यंत्रणा आधीपासूनच व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, डेल्टा प्लसचे रुग्ण ज्या ठिकाणी आढळले आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन, गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे, व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश केंद्राकडून या तीन राज्यांना देण्यात आले आहेत.