भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी


नवी दिल्ली – कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारत बायोटेकने भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर केली आहे. २२ जून रोजी निकालासंदर्भात औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीशी बैठक होण्याची शक्यता आहे. तर, बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर हैदराबादस्थित भारत बायोटेक त्याच्या लसीसंदर्भात ‘प्री-सबमिशन’ बैठक देखील होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

त्याचबरोबर, आपात्कालीन वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना भारत बायोटेकला त्याची लस निर्यात करण्यास परवानगी देण्याची शक्यता असल्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना परदेशामध्ये प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. कारण अद्याप इतर देशांमध्ये ही लस घेतलेल्या लोकांना परवानगी नाकारली आहे किंवा पुन्हा लस घेण्यास सांगितले आहे.

भारत बायोटेक जुलै महिन्यात चाचणी निकाल सादर करेल आणि संपूर्ण परवान्यासाठी अर्ज करेल असे या महिन्याच्या सुरूवातीला सांगितले होते. तसेच, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल हा सर्वात आधी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला सादर केला जाईल, असे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

भारत बायोटेकने मार्चमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निकालांचे पहिले विश्लेषण प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये दुसऱ्या डोसनंतर ८१ टक्क्यांपर्यंत कोरोनाला रोखता येऊ शकते, असे सांगण्यात आले होते. त्याचवेळी, माहितीमध्ये संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या शक्यतांमध्ये देखील १०० टक्के घट झाली होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संयुक्त विद्यमाने भारत बायोटेकतर्फे कोव्हॅक्सिनची निर्मिती करण्यात आली आहे. यासह, भारत बायोटेकने पॅनेशिया बायोटेक, हेस्टर बायो आणि ज्युबिलंट फॉरनॉव यांच्याशी करार केला आहे.

दरम्यान, अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनमधील चाचणी विश्लेषण मान्यता प्राप्त पिअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला भारत बायोटेकने असे सांगितले होते की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला सादर केल्यानंतर तीन महिन्यांच्या मुदतीत ही माहिती प्रसिद्ध केली जाईल.