मेहुल चोक्सीच्या घरवापसीची तयारी पूर्ण? डॉमिनिकात दाखल झाले भारताचे विमान


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला 13500 कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या डॉमिनिकाच्या ताब्यात कर्जबुडवा मेहुल चोक्सी आहे. भारताने डॉमिनिका सरकारला मेहुल चोक्सीच्याविरोधात सर्व पुरावे दिले असून ते डॉमिनिकाच्या स्थानिक न्यायालयामध्ये सादर करण्यात येणार आहेत.

भारत आणि डॉमिनिकामध्ये थेट प्रत्यार्पणाचा करार नाही, तो अँटिगासोबत असल्यामुळे डॉमिनिका न्यायालयाचा निर्णय महत्वाचा असणार आहे. डॉमिनिका न्यायालय आता मेहुल चोक्सीला भारताच्या हवाली करायचे की परत अॅंटिगाला पाठवायचे याचा निर्णय घेणार आहे. मेहुल चोक्सी हा अँटिगावरुन क्युबाला पळून जात होता, त्यावेळी त्याला डॉमिनिकामध्ये अवैधरित्या प्रवास केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली आहे.

सध्या मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये अटकेत आहे. त्याचा अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचे समोर आले आहे. पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता.

मेहुल चोक्सी भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये वास्तव्याला होता. याच बेटावरील डॉमिनिकामधून मेहुल चोक्सीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 62 वर्षीय फरार मेहुल चोक्सी ॲंटिग्वाच्या नागरिकत्वाच्या आधारे 2017 पासून तिथे लपून बसला होता. आता त्याला भारताकडे सोपवण्याची तयारी ॲंटिग्वा सरकारने केली आहे.

चोक्सीने याआधी आपल्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित असल्याचे म्हटले होते. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीला अटक केली आहे. काकाप्रमाणेच नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. नीरव मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशाला यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. त्यामुळे पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणले, तर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेलमध्ये राहणार एवढे मात्र निश्चित आहे.