अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन


मुंबई : साऱ्या देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला या संसर्गामुळे अनेकांनी कायमचे गमावले आहे. अनेक बालके अनाथही झाली आहेत. या व्हायरसने गरीब, श्रीमंत, लहान मोठा असा कोणताही भेद केलेला नाही. अशा या घातक व्हायरसमुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या अभिनेता भूषण कडू याच्या जीवनात मात्र नियतीने दु:ख लोटले आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता आणि विनोदवीर भूषण कडू याच्या पत्नीचं म्हणजेच कादंबरी कडू यांचे वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्याच्या पत्नीच्या निधनाच्या वृत्ताला भूषण कडूच्या काही मित्र आणि निकटवर्तीयांनी दुजोरा दिला. त्यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयातही आणण्यात आले. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. सध्या भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 7-8 वर्षांच्या मुलाला मागे ठेवून आणि सहजीवनाचा हा प्रवास अर्ध्यावरच सोडून कादंबरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नियतीने या कलाकाराच्या कुटुंबासोबत केलेला खेळ पाहून अनेकांचे मन हेलावत आहे.

भूषणची पत्नी ‘बिग बॉस’च्या घरात असतेवेळी सर्वांसमोर आली होती. आपल्या विनोदी शैलीच्या अभिनयासोबतच मनमिळाऊ स्वभावासाठी हा अभिनेता कायमच सर्वांची मने जिंकत असतो. पण, इतरांच्या आनंदासाठी कला सादर करणाऱ्या या कलाकावर आता मात्र ही काय वेळ आली, असेच म्हणत अनेकांनीच त्याच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे.