मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा


कोल्हापूर – राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची येत्या २७ तारखेला भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

आपण मराठा समाजाची भूमिका समजून घेण्यासाठी मराठवाडा खानदेश असा महाराष्ट्र दौरा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. आंदोलन हा एक भाग आहे. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता जीव वाचणे महत्त्वाचे असल्यामुळे अशा वेळी आंदोलन हा विषयच चुकीचा आहे, त्यामुळे या प्रश्नावर अन्य मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले.

या सगळ्यांची येत्या २७ तारखेला भेट घेऊन त्यांना मराठा समाजाची भूमिका समजावून देणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली. आपल्याला उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी भेटायला बोलावल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने अशी भूमिका घ्यावी की समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये. आधीच ५८ मोर्चे काढले आहेत. अजून किती वेळा लोकांना रस्त्यावर आणायचे? सध्या मराठा समाज अस्वस्थ असला तरीही कोरोना काळात जीव महत्त्वाचा असल्यामुळे अशा वेळी आंदोलन हा पर्याय नाही.

गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने धुडकावल्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी शाहू महाराजांनी चळवळ सुरु केली. त्यांनी राज्याला देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिल्याचेही ते म्हणाले.