नागपूर : नागपूरात कोट्यवधींनी 94 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले असून यात धक्कादायक बाब म्हणजे देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या या संबंधित ज्येष्ठ नागरिक महिला मुक्ता बोबडे या आई आहेत. मुक्ता बोबडे यांची नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आकाशवाणी चौकाजवळ वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे. बोबडे कुटुंबाने त्यावर अनेक वर्षांपूर्वी सीजन्स लॉन तयार केले होते. सीजन्स लॉनच्या देखरेखीसाठी मागील 13 वर्षांपासून तापस घोष नावाच्या व्यवस्थापक ठेवले होते. त्याच्यावर लॉनमध्ये येणाऱ्या बुकिंग्स घेणे, लॉनची देखरेख करणे, आलेले पैसे लॉन संदर्भात आवश्यक कामासाठी खर्च करणे आणि उर्वरित रक्कम मुक्ता बोबडे यांच्या खात्यात जमा करणे अशी जबाबदारी सोपविण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईंची कोट्यावधींची फसवणूक
तापस घोषने 2016 पासून मुक्ता बोबडे यांच्या वयाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेत सीजन्स लॉनच्या हिशेबात अफरातफर सुरू केली. तापस घोषने विविध खर्चाच्या आणि लॉनच्या देखभाल दुरुस्तीच्या बनावट पावत्या तयार करून लॉनच्या कारभारात घोटाळा केला. मुक्ता बोबडे यांनी जेव्हा 2013 पासून लॉनच्या कारभारामधील हिशोबासंदर्भात विचारले तेव्हा तापस घोषने त्यांना योग्य माहिती दिली नाही.
मुक्ता बोबडे यांनी त्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली होती. थेट सरन्यायाधीशांच्या आईच्या फसवणुकीचे प्रकरण असल्याने या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथक बनवून सखोल चौकशी केली होती. या प्रकरणी चौकशीत तापस घोषने ज्येष्ठ नागरिक असलेल्या मुक्ता बोबडे यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काल रात्री ( मंगळवार ) सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तापस घोषच्या विरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. अडीच कोटींच्या घरात फसवणुकीची रक्कम असून हे पैसे तापस घोषने कुठे वळते केले, याचा तपास पोलीस करत आहेत.