कोलंबोः महेंद्रसिंग धोनी आणि ऍडम गिलख्रिस्ट या दोघांनी यष्टिरक्षणाच्या कामाचा चेहेरामोहरच बदलून टाकला. त्यांच्या कामगिरीतून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला मोठी प्रेरणा मिळाली, असे उद्गार झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरने काढले. त्याने वयाच्या २९ व्या वर्षी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. इंग्लिश कौंटी क्रिकेट आणि टी- २० च्या माध्यमातून तो पुनरागमन करीत आहे.
धोनी आणि गिलख्रिस्टने बदलून टाकला यष्टिरक्षणाचा चेहेरा
आपल्या संघाला योग्य दिशा सापडत नव्हती त्यामुळे आपण निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे टेलरने सांगितले. निवृत्त होण्याच्या निर्णयाशी पैशाचा काही संबंध नव्हता. स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता, असे त्याने सांगितले.
निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी त्याने झिम्बाब्वेच्या संघासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे झालेल्या सन २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत ४३३ धावा केल्या होत्या. आयर्लंड विरुद्ध १२१ आणि भारत विरुद्ध १३८ अशी कामगिरी करून तो एकदिवसीय क्रिकेटमधून बाहेर पडला. त्याच्या कामगिरीचा लाभ त्याचा संघ उठवू शकला नाही.
इंग्लंड काऊन्टी क्रिकेटमध्ये नॉटिंग हॅममशायरकडून पुनरागमन करण्यापूर्वी त्याने २ वर्ष कोलपाक खेळाचा आनंद लुटला. आता वयाच्या ३४ व्या वर्षी ब्रेंडन टेलर क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा पदार्पण करीत आहे. टी -20 स्पर्धेत खेळण्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. बांगलादेश प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि आता श्रीलंका प्रिमियर लीग (एलपीएल) येथे टेलर खेळणार आहे.
क्रिकेट कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्याचा आनंद लुटण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. मी स्वत:साठी कोणतीही विशेष उद्दिष्ट्ये ठेवलेली नाहीत. मात्र, क्रिकेट कारकिर्दीच्या या उर्वरित वर्षांत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही टेलर याने सांगितले. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची सरासरी ३५- ३५ अशी असली तरी या हंगामात टेलरच्या मोजक्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची ६८ धावांची सरासरी त्याने राखली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाच गिलख्रिस्ट आणि धोनी यासारख्या खेळाडूंचा खेळ बघता आला. त्यांनी यष्टिरक्षणाच्या कामगिरीला नवे पैलू दिले. त्यांच्याकडून काही शिकण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे, असे टेलरने नमूद केले. धोनी आणि गिलक्रिस्ट यांनी खेळाडूंच्या भावी पिढीसाठी पाया घातला. आपली फलंदाजीची बाजू यष्टिरक्षणापेक्षा अधिक सक्षम होती. मात्र, टी- २० मध्ये ‘ग्लोव्हज’ घालून यष्टीच्या मागे उभे राहण्यास मला आनंदच वाटेल, असेही तो म्हणाला.