नवी दिल्ली – मागील अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तराच्या वजनावरुन वादविवाद आणि चर्चा घडून आल्या आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न अनेकदा सरकार दरबारीही उपस्थित झाला होता. पण या प्रश्नावर आता केंद्र सरकारने कायमचे उत्तर शोधले असून शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅग पॉलिसी सरकारने जारी केली आहे. त्यानुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सरकारने जारी केली नवीन बॅग पॉलिसी
सरकारच्या नवीन धोरणानुसार 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन नसावे. तर, 3.5 ते 5 किलो एवढेच बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन असणार आहे. विशेष म्हणजे प्री-प्रायमरी वर्गात शिकणाऱ्यांना बॅग फ्री म्हणजे दफ्तराविना शाळा असे धोरण आखण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून या धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशातील शाळ व महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या बॅगेचे वजन चेक करण्यासाठी शाळांमध्ये वजनकाटा ठेवण्यात येणार आहे.
पुस्तकाच्या पाठीमागे त्याचे वजनही छापणे बंधनकारक पुस्तक प्रकाशकांना करण्यात आले आहे. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 3 पाठ्यपुस्तके असणार आहेत, ज्याचे वजन 1078 ग्रॅम असेल. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 6 पुस्तके असणार आहेत. ज्याचे वजन 4182 ग्रॅम एवढे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅगचे वजन निश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक समितीची नेमणूक केली होती. या समितीने एका दिर्घकालीन सर्वेक्षणानंतर स्कूल बॅगचे वजन निश्चित केले आहे. दरम्यान, देशातील विविध न्यायालयांनीही अनेकदा विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगच्या वजनासंदर्भात मत नोंदवले होते.
500 ग्रॅम ते 3500 ग्रॅम एवढे स्कूल बॅगमध्ये पुस्तकांचे वजन असणार आहे, तर वजन 200 ग्रॅम ते 2.5 किलो ग्रॅम एवढे वह्यांचे असेल. त्यासोबतच, जेवणाच्या डब्ब्याचे आणि पाण्याचे बाटलीचे वजन 200 ग्रॅम ते 1 किलो ग्रॅम एवढेच असणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्केच वजन त्यांच्याकडील दफ्तराचे असणार आहे.