
नाशिक: मराठा समाज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारमधून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी केली आहे.
मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांच्या हकालपट्टीची मागणी
मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही केली आहे. वडेट्टीवार यांनी सरकारकडे मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. ओबीसी समाज नोकरीभरतीसाठी रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. ओबीसी तरुणांमध्ये नोकर भरतीसाठी असंतोष वाढत आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत संवेदनशीलपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. नोकरभरतीत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
