पाकिस्तानचा बुरखा फाडणाऱ्या माजी मंत्र्याला देशद्रोही घोषित करण्याची तयारी सुरू


इस्लामाबाद: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या भारत वापसी मागील सत्य सांगून पाकिस्तान सरकारचा बुरखा फाडणारे खासदार अयाज सादिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इम्रान खान सरकारच्या अडचणी सादिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाढल्या. त्यामुळे आता सादिक यांच्या पाठीमागे इम्रान खान सरकार हात धुवून लागले आहे. त्यानुसार इम्रान खान सरकारने पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष असलेल्या सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी सुरू केली आहे.

कायदेशीर कारवाई सादिक यांच्याविरोधात केली जाऊ शकते, असे खान यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या शिबली फराज यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री इजाज शाह यांनी शनिवारी सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचे संकेत दिले. सरकारकडे सादिक यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. संविधानाच्या कलम-६ अंतर्गत सादिक यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी यातून करण्यात आल्याचे शाह म्हणाले. पाकिस्तानच्या संविधानातील कलम-६ देशद्रोहाशी संबंधित आहे.

पाकिस्तानमधील परिस्थिती भारताच्या एअर स्ट्राईकनंतर काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली. भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती अगदी स्पष्ट दिसत होती. भारताच्या हल्ल्याची बाजवा यांना भीती वाटत असल्याचे सादिक यांनी संसदेला सांगितले. परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी त्या बैठकीला उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. मला कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचे आठवते. पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय थरथर कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असे कुरेशी यांनी म्हटल्याचे सादिक यांनी सांगितले होते.