ठाकरे परिवारवर टीका करणाऱ्या समीत ठक्करला पुन्हा पोलीस कोठडी


मुंबई – नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्यातील ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समित ठक्करला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्विटरवर समित ठक्करने ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन असे संबोधित केले होते.

समित ठक्करला राजकोटमधून २४ ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयात २६ ऑक्टोबर रोजी हजर केले असता ५ दिवसांची कोठडी सुनावली होती. शनिवारी संध्याकाळी त्याची मुदत संपल्यावर पुन्हा एकदा समीतला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने या प्रकरणात आणखी तपास शिल्लक असल्याच्या पोलिसांच्या युक्तिवादाला मान्य करत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात ३२ वर्षीय समित ठक्करने केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी त्याला २४ ऑक्टोबर रोजी अटक केली. समित ठक्कर विरोधात युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी तक्रार केली होती. भाजपच्या आयटी सेलचा आरोपी समित हा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.