मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती


मुंबई : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबतच्या मागील अनेक दिवसांपासुन सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर बदलीसाठी त्यांनी अर्ज केल्याची चर्चा होती. गणेशोत्सव पार पडताच मंगळवारी सुमारे ४५ अधिकाऱ्यांच्या बदलींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी दीपक पांडे यांना त्यांच्या रिक्त पदावर संधी देण्यात आली आहे.

नांगरे पाटील यांनी दोन वर्षांपुर्वी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून २ मार्च २०१९ स्विकारला होता. तसेच गेल्या वर्षी २ मार्च रोजी संजय दराडे यांच्याकडून जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी नाशिकच्या पोलीस अधिक्षक पदाचा पदभार यांनीही पदभार स्विकारला होता. अमरावतीच्या आयुक्तपदी सिंह यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे, तर विनंती अर्जावरुन नांगरे पाटील यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच नाशिकचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे यांचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्तपदी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असलेले प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोरजे यांनी ३० मे २०१८ रोजी पदभार स्वीकारला होता. सिंह यांच्या रिक्त पदावर अद्याप कोणतेही नाव निश्चित झालेले नाही.