या महिन्याच्या 28 तारखेपासून सुरु होणार राज्यातील जिम आणि सलून; मंत्रिमंडळाची मंजूरी


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या जिम आणि सलून सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून ठाकरे सरकारने राज्यात येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून जिम आणि सलून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प होते. पण अनलॉकिंगनंतर सरकारने हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जिम आणि सलून या आठवड्यात सुरु होतील, अशी माहिती दिली आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही नियम शिथिल केले होते. तर काही व्यवसाय नियम व अटींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायाला सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. लॉकडाऊनमुळे आलेल्या अर्थिक संकटामुळे राज्यात आतापर्यंत 5 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप नाभिक समाजाचे सोमनाथ काशिद यांनी केला होता.

एकीकडे इतर व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला का परवानगी नाही, असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी सरकारला केला होता. पण नाभिक समाजाच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक भूमिका घेत नसल्याचे दिसताना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी केली होती. दरम्यान, याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आधीच संकेत दिले होते. राज्यातील सलून व्यवसाय येत्या चार-पाच दिवसांत सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.

Leave a Comment