महाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात; आजपासून या गोष्टी होणार सुरू


मुंबई – आजपासून महाराष्ट्रात राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत असून आजपासून मागच्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकाने सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींचे पालन देखील करावे लागणार आहे.

आजपासून या गोष्टी होणार सुरू

  • प्रवासासाठी मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत परवानगीची अट काढून घेण्यात आली असून नागरिकांना आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे विनापरवानगी प्रवास करता येईल.
  • नागरिकांसाठी पहाटे पाच ते रात्री सात या वेळेत उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. नागरिक यावेळेत व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. पण व्यायामाचे कोणतेही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम यावेळी वापरता येणार नाही.
  • पूर्ण दिवस दुकाने सम-विषम नियमाने सुरु ठेवण्याची परवानगी असून रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने एका दिवशी सुरु राहतील. नियमांचे पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसेच दुकान मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्त्वाचे असेल.
  • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसणार आहे, कारण त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.
  • वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास रविवारपासून म्हणजेच ७ जून २०२० पासून परवानगी देण्यात आली आहे. पण यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
  • विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.

Leave a Comment