नवी दिल्ली – केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खाल्ल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी सर्वच माध्यमांमध्ये झळकनंतर, सर्वच स्तरातून या घटनेवर संताप व्यक्त व्हायला लागला. अखेरीस कडक पावले केरळ सरकारने उचलत मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि वन-विभागातर्फे खास ऑपरेशन आखले. अखेरीस सरकारी यंत्रणांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी केरळ वन-विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे. या कारवाईविषयीची माहिती केरळ वन-विभागाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.
गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी केरळ वन-विभागाने केली एकाला अटक
Major breakthrough!
KFD has zeroed on the culprits and recorded the first arrest in the wild elephant death case.
— Kerala Forest Department (@ForestKerala) June 5, 2020
दरम्यान अद्याप या आरोपीचे नाव व इतर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही सरकारी यंत्रणांना हत्तीणीच्या मृत्यूनंतर मिळालेले हे पहिले यश मानले जात आहे. या हत्तीणीने २७ मे रोजी वेलियार नदीत आपला अखेरचा श्वास घेतला. ही घटना वन-अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांसमोर आली होती. यानंतर केरळ सरकारने घटनेची दखल घेत, मारेकऱ्यांना अटक करण्याचे आश्वासन दिले होते.