कोरोनाबाधित वाढीमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानी; मागील 24 तासांत 10 हजार रुग्णांची वाढ


नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र आता दिसू लागले आहे. त्यातच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज सकाळपर्यंत देशात 2 लाख 26 हजार 770 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी कोरोनाने 6348 लोकांचा बळी घेतला आहे. तर एक लाख 9 हजार लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मागील 24 तासांमध्ये देशात कोरोना व्हायरसमुळे 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्राझीलमध्ये बुधवारी 27,312 आणि अमेरिकेमध्ये 20,578 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर रशियामध्ये 8,536 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ देशातील नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आज 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिका, ब्राझील, रुस, ब्रिटन, स्पेन आणि इटलीनंतर कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2710, गुजरातमध्ये 1155, दिल्लीमध्ये 650, मध्य प्रदेशमध्ये 377, पश्चिम बंगालमध्ये 355, उत्तर प्रदेशमध्ये 245, तमिलनाडुमध्ये 220, राजस्थानमध्ये 213, तेलंगानामध्ये 105, आंध्र प्रदेशमध्ये 71, कर्नाटकमध्ये 57, पंजाबमध्ये 47, जम्मू-कश्मीरमध्ये 35, बिहारमध्ये 29, हरियाणामध्ये 24, केरलमध्ये 14, झारखंडमध्ये 6, ओडिशामध्ये 7, असाममध्ये 4, हिमाचल प्रदेशमध्ये 5, मेघालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment