राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 65,168 वर


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काल दिवसभरात तब्बल 2940 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 65,168 वर पोहचली आहे. या पैकी सध्या राज्यात 34,881अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल राज्यात 99 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे काल 1084 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी राज्यात विक्रमी आठ हजारांच्यावर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

काल झालेल्या 99 मृत्यूपैकी 40 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 6 ते 27 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 59 मृत्यूपैकी मुंबई 35, पनवेल 7, ठाणे 6, वसई विरार 6, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 1, जळगाव 1 तर, इतर राज्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65,168 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 35 हजार 420 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. काल झालेल्या मृत्यूंपैकी 62 पुरुष तर 37 महिला आहेत. त्यातील 48 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 49 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर, 2 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 99 रुग्णांपैकी 66 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment