आता मजुरांना परत आणण्यासाठी विशेष रेल्वे धावणार

फोटो साभार इंडिया डॉट कॉम

करोना मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. लॉकडाऊन शिथिल होत असल्याने अर्थव्यवस्थेला गती येईल हे खरे असले तरी प्रवासी मजूर ही समस्या गंभीर ठरणार आहे. लॉकडाऊन काळात घरी परतलेल्या या मजुरांना परत कामावर आणण्यासाठी रेल्वे विशेष ट्रेन चालविणार असल्याचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

ठाकूर म्हणाले लॉक डाऊन काळात ५० लाखाहून अधिक मजूर त्याच्या घरी गेले आहेत. ते परतले नाहीत तर अनेक राज्यात उद्योग व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. परिणामी अर्थव्यवस्थेची गती मंदावणार आहे. यामुळे सरकारने घरी गेलेल्या मजुरांना परत कामावर आणण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्याचा विचार केला आहे.

दरम्यान उद्योगानाही त्यांनी त्याच्या कामगाराच्या संपर्कात राहावे असे आवाहन केले गेले असून लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मजुरांना परत आणण्याचे काम सुरु होईल असे समजते. दक्षिणेकडील राज्यात बांधकाम तसेच अनेक उद्योगात मोठ्या संखेने मजुरांची कमतरता जाणवत असल्याचे अनेक रिपोर्ट आले आहेत. सध्या जे मजूर उपलब्ध आहेत त्यावरच काम सुरु केले जात आहे आणि मजूर राहावेत म्हणून त्यांना जादा पगार दिला जात आहे असेही समजते.

२५ मार्च ला लॉकडाऊन सुरु झाल्यावर आर्थिक उलाढाल मंदावली आणि अनेक मजुरांवर बेरोजगारीचे संकट आले. यामुळे परराज्यातून अनेक मजूर मिळेल त्या साधनांनी आपापल्या गावी परतले. १ मे पासून रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या होत्या. आता गावी परतलेल्या या मजुरांना पुन्हा बोलावणे हे मोठे आव्हान बनले असून हे मजूर परतले नाहीत तर अनेक कामे ठप्प होण्याची भीती आहे.

Leave a Comment