राज्यातील दारुच्या होम डिलिव्हरीचा नारळ अखेर फुटला


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने काही अटींसह मद्य विक्री करण्यास मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने देखील केंद्राच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. पण निर्णयानंतर सोशल डिस्टेंसिंगचा उडालेला बोझवार पाहता सरकारला धडकीच भरली. त्यानंतर राज्य सरकारने तात्काळ काही ठिकाणी सुरु असलेली मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार घरपोच मद्यसेवा (ई-टोकन) विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून घरपोच मद्यविक्रीला सुरूवात झाली. राज्यातील पाच हजार ४३४ ग्राहकांना दिवसभरात घरपोच मद्यविक्री केल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

लातूर आणि नागपूर या दोन शहरातून घरपोच मद्यविक्रीसाठी राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागपूर आणि लातूर या शहरातून तब्बल ८८ टक्के ग्राहक असून राज्यातील एकूण ग्राहकांपैकी चार हजार ८७५ ग्राहक या दोन शहरातील असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सीलबंद मद्यविक्री तीन मे पासून लॉकडाऊन कालावधीत सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात ( ३ ड्राय जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे, तर काही जिल्हयांमध्ये मद्यविक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ४५९७ अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उमाप यांनी दिली.

मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन सुविधा उलब्ध केली आहे. http://www.mahaexcise.com या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. मद्य खरेदी करण्यासाठी ई-टोकन कसे मिळवायचे याबद्दलचा एक व्हिडीओ देखील उत्पादन शुल्क विभागाने जारी केला आहे. त्यात संपूर्ण प्रक्रियेची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे.

Leave a Comment