महिन्याभरात कोणतीही परीक्षा न घेता आरोग्य विभागात ३० हजार जागांची भरती


मुंबई – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहाता आगामी महिन्याभरात आरोग्य विभागात जवळपास ३० हजार रिक्त जागा भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जवळपास 30 हजार जागा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये रिक्त आहेत. महिना ते दीड महिन्यात या सर्व जागा भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

मुंबईतील बीकेसी आयसोलेशन सेंटर व वरळी येथील एनएससीआय डोम या दोन्ही कोविड केअर सेंटरला कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यावेळी उपस्थित होत्या. राजेश टोपे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना लवकरच आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरणार असल्याची माहिती दिली.


तातडीने रिक्त जागा भरण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली असून राज्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या जागाही तात्काळ भरण्यात येणार आहेत. १७ हजार ३३७ जागा सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात ११ हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा महिन्याभरात भरण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात असून परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, एमबीबीएसची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार असल्याचेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

Leave a Comment