तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिन्ही झोनमधील मद्यविक्रीला सशर्त परवानगी


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, ग्रीन व ऑरेंज झोनमधील अनेक निर्बंध उठवले असून उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमधील केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने काल स्पष्ट केले आहे.

ग्रीन, ऑरेंज व रेड या तिन्ही झोनमध्ये बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या आणि स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना सोशल डिस्टनिंग म्हणजेच एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. पण कंटेनमेंट झोनमध्ये मद्यविक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनच्या दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. पण ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे योग्य पालन केले तर मद्यविक्रीची दुकाने सुरु केली जाऊ शकतात, असे संकेत दिले होते.

लॉकडाउनच्या घोषणेनंतर देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून लॉकडाउनची सर्वच राज्यांनी कडक अंमलबजावणी केल्यामुळे मद्यपींची या काळात दारुसाठी चांगली दैना झाली. केरळमध्ये तर मद्यपी आत्महत्या करत असल्याच्याही घटना समोर आल्या. त्यानंतर केरळ सरकारने व्यसन जडलेल्या मद्यपींना डॉक्टरची चिठ्ठी असेल तर दारु देण्याचा निर्णय घेतला होता. पण देशभरात दारू विक्री बंदच होती. विशेष म्हणजे या काळात अवैध मार्गाने होणारी दारू विकणाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या.

Leave a Comment