त्या काळात होणारी पोटदुखी टाळण्यासाठी करावीत ही योगासने


महिलांना मासिक धर्माच्या दिवसांमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा या दिवसांमध्ये उद्भवणारी पाठदुखी, पोटदुखी, कंबरदुखी यांमुळे अनेक महिला आणि तरुण मुली देखील हैराण होत असतात. तसेच दिवसभराच्या कामाच्या धावपळीने म्हणावा तसा आरामही मिळतोच असे नाही. मात्र दैनंदिन व्यायाम करीत असताना काही विशिष्ट योगासने आपल्या व्यायामामध्ये समाविष्ट केली गेली, तर मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणारा त्रास नक्कीच पुष्कळ अंशी कमी होऊ शकतो.

बालासन हे आसन महिलांच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. या आसनामध्ये वज्रासानामध्ये बसून, त्यानंतर पुढच्या बाजूला झुकून दोन्ही हात जमिनीवर पसरुन हे आसन करायचे असते. हे आसन करणे फारसे अवघड नाही, आणि यामुळे होणारा फायदा मात्र मोठा आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या दैनंदिन व्यायामामध्ये या आसनाचा समावेश नक्कीच करायला हवा. या आसनाने कंबर आणि पाठीच्या स्नायूंना आवश्यक ताण मिळतो. या आसनामुळे बद्धकोष्ठ दूर होते. तसेच शरीराच्या नर्व्हस सिस्टमला देखील आराम देणारे हे आसन आहे.

हे आसन करताना पाय दुमडून वज्रासनाच्या स्थितीत बसावे. त्यानंतर कंबरेतून खाली सावकाश झुकत दोन्ही हात पुढच्या बाजूला जमिनीवर पसरावेत. संपूर्णपणे खाली झुकल्यानंतर कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीमध्ये तीस सेकंद राहिल्यानंतर सावकाश कंबरेतून ताठ होत वर येत पूर्वस्थितीला यावे. वज्रासनामध्ये बसताना पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घ्यावी. ज्यांना पहिल्यापासून पाठदुखीचा त्रास आहे, किंवा ज्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्या महिलांनी हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी देखील हे आसन करू नये. त्याचसोबत पोट बिघडले असल्यासही हे आसन करू नये.

मासिक धर्माच्या दिवसांमध्ये होणारी पोटदुखी, कंबरदुखी टाळण्यासाठी बालासानासोबत दंडासनही अतिशय उपयुक्त आहे. हे आसनही करण्यास अतिशय सोपे आहे. या आसनामध्ये जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर ताठ ठेवायचे आहेत. पायांची बोटे आपल्याकडे झुकलेली असावीत. त्यानंतर ताठ बसून दोनही हात बाजूला, पण शरीराच्या अगदी जवळ ठेवावेत. हाताचे तळवे जमिनीला संपूर्ण टेकवून ठेवावेत. पाठीचा कणा आणि मान ताठ असावी. खांदे ताठ असावेत, आणि नजर समोर असावी. याच स्थितीमध्ये तीस सेकंद ते एक मिनिटभर बसावे. या आसनामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. तसेच पाठीच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. हे आसन मेंदूला शांत करणारे आणि पचनशक्ती सुधारण्यास सहायक आहे.

पश्चिमोत्तानासन आणखी एक उपयुक्त आसन असून यामुळे पाठीच्या मणक्यांना आणि स्नायूंना आवश्यक व्यायाम मिळतो. या आसनामध्ये पोटाच्या व छातीच्या स्नायूंना देखील आवश्यक तो व्यायाम मिळतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसवून दोन्ही पाय समोरच्या बाजूला ताठ ठेवावेत. पाठीच्या स्नायूंना शिथिल करीत श्वास घेत हात डोक्यावर ताठ करावेत. आता सावकाश श्वास सोडत कंबरेतून खाली झुकत जावे. आपल्या हातांनी पायांची बोटे पकडण्याचा प्रयत्न करावा. तसेच खाली झुकल्यानंतर आपले कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करावा. या वेळी श्वासोत्छ्वास संथ ठेवायचा आहे. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर सावकाश श्वास घेत पूर्वस्थितीला यावे. या आसनाची पाच आवर्तने करावीत. पोटाचा काही त्रास असल्यास, आतड्यांना सूज असल्यास हे आसन करू नये. तसेच ज्यांना कंबरदुखीचा एरव्हीही त्रास होतो त्यांनी ही हे आसन टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment