मुंबईत लवकरच होणार रॅपिड टेस्टिंग


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार आहे. केंद्र सरकारने रॅपिड टेस्टसाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. यानंतर दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स आता मुंबई महापालिका विकत घेणार आहे. ते किट्स आल्यानंतर मुंबईत रॅपिड टेस्टिंगला सुरुवात होईल, अशी माहिती आहे. एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झाले आहे की नाही याची तात्काळ माहिती रॅपिड टेस्टमुळे मिळते. तसेच इन्फेक्शन झाले असल्यास त्या व्यक्तीची तात्काळ कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने कोरोनाग्रस्त किंवा संशयित रुग्णांना ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट (समूह तपासण्या) करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता त्यासाठी एका पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने ज्याप्रमाणे आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासतो त्याचप्रमाणे ही तपासणी केली जाईल. त्यानंतर संबंधितास कोरोनाची पुढील तपासणी करण्याची किंवा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन करण्याची गरज आहे की नाही, हे देखील स्पष्ट होईल.

याबाबत यापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माहिती दिली होती. मुंबईत अनेक भाग मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आले आहेत. दाट लोकसंख्येचे ते भाग आहेत. अशा ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठीचे सॅम्पल घेणे, त्याचा अहवाल येणे यात वेळ जाऊ शकतो, त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे कठीण होईल म्हणून ही रॅपिड टेस्ट करावी, असा आग्रह राज्य सरकारने धरला होता. या तपासण्या आम्ही खाजगी लॅबच्या माध्यमातूनही करुन घेऊ शकतो, असे टोपे यांनी सांगितले होते.

Leave a Comment