नाम फाऊंडेशनची कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1 कोटींची मदत


मुंबई : कोरोनाचा राज्यभरात कहर वाढत असून राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. यात आता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम या फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.

विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींपासून अगदी सर्वसामान्यांनी आतापर्यंत कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला जितके शक्य आहे तेवढी मदत केली आहे. हा मदतीचा ओघ हळूहळू वाढत आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करीत आपण मदत करीत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करीत असल्याचे सांगितले.


आपण सर्वांनी या क्षणाला जात-धर्म विसरुन सरकारला सहकार्य करण्यासाठी पुढे यायला हवे. एवढ्या मोठ्या संकटाशी सरकार एकटे लढू शकत नाही. सर्वानी यासाठी एकजूट होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी नाम फाऊंडेशनकडून प्रत्येकी 50 लाख रुपये पाठविणार आहोत. कृपया घराबाहेर पडू नका. सध्या घराबाहेर न पडणे हीच मोठी देशसेवा आहे. याशिवाय कोरोनाशी लढ्यात सहकार्य म्हणून मदत कराल अशी आशा आहे. आतापर्यंत अनेक उद्योगपती, खेळाडू, अभिनेत्यांनी पंतप्रधानांना मोठी मदत केली आहे. या मदतीतून कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment