राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; पुणे, बुलढाण्यात 2-2 तर मुंबईत एक नवा रुग्ण


मुंबई : राज्यात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आढळून आले आहेत. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. 10 लोकांचा राज्यात आतापर्यंत मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सोमवारी दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज लॉकडाउनचा 7 वा दिवस आहे, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.

सोमवारी राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचे मृत्यू झाले. 78 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. राज्यातील 39 रुग्णांची तब्येत बरी झाली, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Leave a Comment