अमानवीय वागणूकः स्वगृही परतणाऱ्या मजुरांचे भररस्त्यात सॅनिटाईज


बरेली : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या देशभरात होत असून त्यातच राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे परगावी असलेले मजुर आपल्या स्वगृही जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसऱ्या भागातून आलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशातील बरेलीत रस्त्यावर बसवून त्यांच्यावर एकत्रितपणे औषधांची फवारणी करण्यात आली. सध्या यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या कुटुंबासह दिल्ली, हरियाणा, नोएडा येथे काम करीत असलेले शेकडो मजुर गावी परतले आहे. मजुरांच्या कुटुंबियांना येथे अगदी महिला आणि लहान मुलांना रस्त्यावर बसवून सर्वांवर एकत्रित औषधांची फवारणी करण्यात आल्यानंतर अनेक लहान मुलांच्या डोळ्यांची जळजळ होत असल्याचे समोर आले. पण यापैकी कोणालाच रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही तर त्यांना घरी पाठविण्यात आले.


दुसरीकडे बिहारच्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांना घरी आल्यावर बंद करण्यात आले आहे. ते रडत आहेत आणि सुटकेची मागणी करीत आहेत. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्य सरकारने यामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी अशी भयंकर पद्धती वापरत असल्याचे म्हटले आहे. खूप कष्ट आणि प्रयत्न केल्यानंतर हे मजुर आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यांना वेगळे ठेवण्याची ही पद्धती धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment