जगातील सर्वात लठ्ठ मुलगा आरिया परमानाने 4 वर्षात तब्बल 110 किलोंनी आपले वजन कमी केले आहे. 2016 मध्ये त्याचे वजन 193 किलो होते. मात्र आता 13 वर्षीय आरियाचे वजन 83 किलो आहे. सोशल मीडियावर त्याचे ट्रेनर अदे रॉय यांनी आरियाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. आरियाची एक बॅरिएट्रिक सर्जरी झालेली आहे. अजून 2 सर्जरी होण्याची शक्यता आहे.
आरियाच्या वडिलांनी सांगितले की, त्याने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. बॅरिएट्रिक सर्जरीसोबत डाइट आणि नियमित व्यायामाची देखील काळजी घेतली.
ट्रेनर अदेने सांगितले की, जेव्हा आरिया माझ्याकडे आला होता, त्यावेळी मी त्याच्या आई-वडिलांना त्याची दिनचर्या आणि आहार संतुलित करण्यास सांगितले होते. सोबतच त्याला प्रोत्साहित केले. सुरुवातीला छोटे छोटे टास्क दिले. त्यानंतर हळूहळू वेटलिफ्टिंग केले. मी त्याला केवळ दिशा दिली. बाकी सर्व मेहनत आरियाची आहे.
एका सर्जरीनंतर आरियाचे वजन वेगाने कमी झाले व 150 वरून 87 वर आले. सध्या त्याचे वजन 83 किलो असून, तो हे वजन देखील कमी करणार आहे.
आरियाच्या आई-वडिलांनी सांगितले की, जन्मावेळी त्याचे वजन साडे तीन किलो होते. मात्र 2016 मध्ये ही स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. तो 8 वर्षांचा असताना त्याची भूख अचानक वाढली. 2 वर्षात तब्बल 88 किलो वजन वाढल्याने त्याला जगातील सर्वात लठ्ठ मुलगा म्हणून ओळखले जाऊ लागले. 10 वर्षांचा असताना त्याचे वजन 193 किलोपर्यंत पोहचले होते.