काँग्रेसने मोदींना पाठवले कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल


नवी दिल्ली: रविवारी मोठ्या उत्साहात देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. राजपथावर यावेळी भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. तर सोशल मीडिया व अन्य माध्यमातून देशातील नागरिकांनीही एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, या सगळ्यात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या एका ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या या गांधीगिरीची जोरदार चर्चा आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. कारण, अॅमेझॉन या ई-कॉर्मस संकेतस्थळावरून संविधानाची प्रत खरेदी करून काँग्रेसने नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवली आहे. पण, ही प्रत काँग्रेसने खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला असल्यामुळे हे पार्सल केंद्रीय सचिवालयात पोहोचल्यानंतर त्यांनाच याचे पैसे चुकते करावे लागतील. तर दुसरीकडे प्रत स्वीकारली नाही तर भाजपची एकप्रकारे कोंडी केली जाऊ शकते.

या पार्सलची पावती ट्विटरवर काँग्रेसने शेअर केली आहे. यासोबत एक खोचक संदेशही लिहण्यात आला आहे. संविधानाची प्रत लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. जेव्हा देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला सवड मिळेल तेव्हा कृपया संविधान वाचा, असे काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment