शरद पवारांच्या भेटीला संजय राऊत; राजकीय घडामोडींना वेग


मुंबई – भाजप-शिवसेनेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून वाद सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन समीकरणे उदयाला येण्याच्या चर्चांना उधाण आले. शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन भाजपला या भेटीमुळे ठेंगा दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी शिवसेनेला म्हणावी तशी ऑफर आणि तशी वागणूक भाजपकडून अद्यापही मिळालेली नाही. त्यातच शिवसेनेने केवळ तोंडी चर्चा सुरू असून भाजपसोबत जाण्याची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. सिल्वर ओक हा बंगला राजकीय वर्तुळाचे केंद्र बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी आपल्या मित्रपक्षाला “वेट अँड वॉच”ची भूमिका घेण्याचे या भेटीमध्ये सांगितले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान पवार यांची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भेट घेतल्यानंतर सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा पाठिंबा मिळाला तर राज्यात सहजपणे शिवसेना सत्ता स्थापन करू शकते असा कयास आता लावला जात आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास राज्यात पक्षीय बलाबल हे 164 वर जाणार असून त्यात अपक्ष आणि इतरांची भर पडल्यास शिवसेनेला मजबूत सरकार स्थापन करता येऊ शकते असाही कयास लावला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची बोलले जात आहे. मात्र, माध्यमांशी बोलताना ही भेट केवळ दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी घेतली असून या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

Leave a Comment