मोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला पाच वर्षांचा कारावास !


नवी दिल्ली – एका पाकिस्तानी गायिकेने काही दिवसांपूर्वी साप आणि मगरींच्या मदतीने काश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या गायिकेचे नाव राबी परिजाद असे असून तिला ही धमकी देणे खूपच महागात पडले आहे. राबीला ट्रोल होण्याबरोबरच आता बेकायदेशीररित्या घरात साप ठेवल्याप्रकरणी दंड भरण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तसेच राबीला या प्रकरणात दोषी आढळल्यास पाच वर्षाचा तुरुंगवास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्या युट्यूब चॅनेलवर राबीने एक व्हिडिओ अपलोड केला होता. तिने यामध्ये काश्मीर प्रश्नावरुन चिंता व्यक्त केली होती. पण तिच्या हातात ती बोलत असतानाच साप असल्याचे व्हिडिओत दिसत होते. तसेच ती उभी असलेल्या टेबलवर अनेक साप आणि मगरी पडलेल्या दिसत होत्या. राबीने या व्हिडिओमधून पंतप्रधान मोदींसाठी हे साप आणि मगरी म्हणजे माझ्याकडून दिलेली भेट आहे. हे सर्व तुमच्यावर ताव मारतील, अशी विचित्र धमकी दिले होती. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला. या व्हिडिओवरुन अनेकांनी राबीला ट्रोल केले.

हे प्रकरण शांत होत असतानाच वन्यजीव विभागाने आता या व्हिडिओची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. राबी या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. पण मी हे प्राणी पाळलेले किंवा घरात ठेवलेले नसून व्हिडिओ शूट करण्यासाठी ते मी भाडेतत्वावर आणले होते असे राबीने दुसऱ्या एका व्हिडिओमदून स्पष्ट केले आहे. कारवाईची बातमी समोर आल्यानंतर घाबरलेल्या राबीने दुसरा एक व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. मी अनेक वृत्तवाहिन्यांवर मागील पाच वर्षांमध्ये साप घेऊन उपस्थित राहिले आहे. त्यावेळी माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण आता मी दुर्देवाने मोदींना इशारा दिला तर माझ्यावर कारवाई केली जात आहे, असे राबी या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.

या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे समजल्यानंतर तिने कोणाचेही नाव न घेता पाकिस्तानमधील देशद्रोही लोकांपेक्षा भारतीय खूप चांगले आहेत, असे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानमधील वन्यजीव विभाग हा देशद्रोही आहे. मी कधीच भारतीयांवर टीका केली नाही. केवळ मोदींवर मी टीका केली. तुम्ही जर पाकिस्तानवर प्रेम करु शकत नाही तर किमान देशाला फसवू तरी नका, अशा शब्दांमध्ये राबीने वन्यजीव विभागावर टीका केली.

Leave a Comment