आम्हा कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही – संभाजीराजे


मुंबई – महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी जोरदार निशाणा लगावला आहे. आपल्या फेसबुक पेजवरुन संभाजीराजेंनी एक व्हिडिओ शेअर करत तावडेंना लक्ष केले आहे. सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी ज्या पद्धतीने मंत्री विनोद तावडेंनी मदत मागितली, संभाजीराजेंनी त्याचा निषेध केला आहे. कोणाच्या भीकेची स्वाभिमानी कोल्हापूरकरांना गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.


त्याचबरोबर संभाजीराजेंनी पूरग्रस्तांची क्रूर चेष्ठा सहन केली जाणार नसल्याचेही म्हटले आहे. संभाजीराजेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनोद तावडे हे हातात डबा घेऊन सांगली आणि कोल्हापुरातील पुरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. ते रस्त्यावर उतरुन माईकच्या माध्यमातून जनतेला मदतीचे आवाहन करत आहेत. संभाजीराजेंनी यावर नाराजी व्यक्त करत आम्हाला कोणाच्या भिकेची गरज नसल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment