राज ठाकरेंच्या नोटीशीवरुन एकवटले विरोधक


मुंबई – कोहिनूर मिलप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. येत्या 22 ऑगस्टला यासंदर्भात ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही याप्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली त्यानुसार त्यांची काल ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. पण ईडीच्या या नोटीशीवरुन विरोधक अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत म्हणून, त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जात असल्याचे वक्तव्य केले. केंद्र सरकारच्या विरोधात काही प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही. राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी त्यांनाही ईडीची नोटीस बजावली असल्याचे थोरात म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचे वक्तव्य केले. ईडीने त्यांना नोटीस सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने बजावली आहे. असे कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात होत नव्हते असेही पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना ईडीची नोटीस आल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून सुरुवात झाली. मुंडे यांनी ही प्रतिक्रिया यावेळी तालुक्यातील बाळापूर येथे जाहीर सभेत बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी सरकारच्या विरोधात प्रश्न उपस्थित केले म्हणून, विरोधकांवर दडपशाहीचा प्रकार सरकारकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. ही एक प्रकारे सरकारची दडपशाही असून याला आता जनताच उत्तर देईल, असा इशारा दिला.

Leave a Comment