असे आहे अभिनेत्री आलिया भट्टचे ‘मॉर्निंग रुटीन’


अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘सडक-२’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असली, तरी तिने आपल्या चाहत्यांशी बातचीत करण्यासाठी आवर्जून वेळ देत आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते हे सांगणारा एक व्हिडियो नुकताच तिच्या खासगी युट्युब वाहिनीवर अपलोड केला आहे. या व्हिडियोमध्ये तिच्या दिनक्रमाची सुरुवात करताना ती कोणत्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ देते, याबद्दल बोलताना आलिया दिसत आहे.

यामध्ये सकाळी उठल्यानंतर ताबडतोब मोबाईल फोन हातात घेऊन त्यावरले मेसेजेस वाचणे किंवा इतरांच्या पोस्ट्स वाचणे आपण काटेकोरपाने टाळत असल्याचे आलिया सांगते. सोशल मिडियावरील पोस्ट्स पाहण्यापेक्षा मोबाईल फोन वरील इतर अॅप्सच्या मदतीने त्यादिवशीच्या अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या, हवामान, आरोग्य आणि आहारासंबंधी काही आर्टिकल्स वाचणे आलियाला आवडते. चित्रीकरणासाठी बाहेर जावे न लागता आलिया जर घरीच असली, तर तिच्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्रवाचनाने होत असते.

सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी घेण्याच्या ऐवजी आलिया लिंबू पाण्याचे सेवन करणे पसंत करते. आलियाला कॉफी अतिशय प्रिय असून, एके काळी ती दिवसभरात अनेकदा कॉफी पीत असे. पण आता मात्र आलियाने कॉफी पिण्याचे प्रमाण अतिशय कमी केले आहे. आलिया जर चित्रीकरणाच्या निमित्ताने बाहेर, घरापासून दूर असेल, तर सकाळच्या प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालविणेही तिला मनापासून आवडते.

आलियाने अलीकडेच सध्याच्या तिच्या दिनक्रमात एका नव्या सवयीचा समावेश केला आहे. ही सवय दररोज रोजनिशी लिहिण्याची असल्याचे सांगत यामध्ये दररोज किमान एखादी ओळ तरी लिहायचीच असा निश्चय आलियाने केला असल्याचे ती म्हणते. आलिया आपल्या रोजनिशीला ‘वन लाईन अ डे’ या नावाने संबोधत असून, दररोज तिच्या जीवनाशी निगडीत एक तरी ओळ या रोजनिशीमध्ये लिहिण्याचा तिचा प्रयत्न असतो.
त्यानंतर त्या दिवशी चित्रित होणार असलेल्या दृश्यांच्या संवादांचे पाठांतर आलिया करते. मात्र कधी कधी काही संवाद लक्षात ठेवणे आलियाला जड जात असून, त्यासाठी तिला अधिक प्रयत्न करावे लागत असतात.

हे प्रयत्न असफल ठरले तर तिला क्वचित स्वतःचाच रागही येत असल्याची कबुलीही आलिया देते. सकाळी उठताबरोबर नाश्ता करण्याची आपल्याला सवय नसल्याचे सांगत, सुरुवातीला काही कामे हातावेगळी केल्यानंतरच आपण नाश्ता घेत असल्याचे आलियाने व्हिडियोमध्ये म्हटले आहे. सध्या आलिया ‘सडक-२’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन आलियाचे पिता, सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट करीत आहेत. संजय दत्त, पूजा भट्ट अभिनीत ‘सडक’ या चित्रपटाचाच हा रीमेक असून, यामध्ये आदित्य रॉय-कपूर नायकाची भूमिका करीत आहे. संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्याही या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Comment