हिमाचल प्रदेशात नोव्हेंबरपासून प्रथमच सुरु होणार जलपरिवहन सेवा


हिमाचल प्रदेशामध्ये या वर्षीच्या अखेरीपासून, म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासून प्रथमच जलपरिवहन सेवा सुरु केली जाणार आहे. या सेवेअंतर्गत उपलब्ध करविल्या जाणाऱ्या जलपरिवहनाच्या पहिल्या चरणात सतलज नदीमार्गे बोटीतून आवागमन करता येणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये पुढली वर्षी चामेरा, गोबिंदसागर, आणि पोंग धरणक्षेत्रामध्येही जलपरिवहनाची सुविधा उपलब्ध करविण्यात येणार आहे. यासाठी ज्याप्रमाणे बसेसना वाहतुकीसाठी ‘रोड ट्रान्सपोर्ट परमिट’ दिले जाते त्याचप्रमाणे स्टीमर बोटींना ‘वॉटर ट्रान्सपोर्ट परमिट’ आले जाणार असून, या बोटी उभारण्यासाठी, तत्तापानी आणि कसोल या गावांच्या परिसरामध्ये चार जेटी उभारण्याचे काम लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या जेटींवरून बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बोटीवर चढता -उतरता येणार आहे. या जेटी सुन्नी कॉलेजच्या दोन्ही किनाऱ्यांवर, तत्तापानी पुलापाशी आणि कसोलच्या जवळ बनविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून या कामी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.

जलपरिवहन करण्यासाठी जे मार्ग निश्चित करण्यात येणार आहेत, त्या मार्गांवर बोटी चालविण्याचे परमिट देताना सुशिक्षित बेरोजगारांना प्राथमिकता दिली जाणार आहे, जेणेकरून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे. यासाठी परिवहन विभागाकडून आधीपासूनच जलपरिवहन सेवा उपलब्ध असलेल्या गोवा, आसाम आणि कोलकाता मध्ये या सेवेचे नियोजन कश्या प्रकारे केले जात आहे, याचे अध्ययन केले जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नव्याने सुरु होत असणाऱ्या जलपरिवहन सेवेमुळे लोकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून, पैशांची बचतही होणार आहे. सतलज नदीमध्ये जलपरिवहन सेवा सुरु झाल्यानंतर लोकांना तत्तापानी पासून मंडी किंवा बिलासपुर येथे पोहोचण्यासाठी कमी अवधी लागणार आहे.

सरकारच्या वतीने जलपरिवहन मार्गांची पाहणी आधीच करण्यात आली असून, ही सेवा उपलब्ध झाल्याने त्यामुळे राज्यामध्ये पर्यटनाला आणखी चालना मिळणे अपेक्षित आहे. तसेच या सेवेमुळे सिमला, मंडी, बिलासपुर, आणि सोलन जिल्ह्यातील नागरिकांना उपजीविकेचे साधनही उपलब्ध होऊ शकणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये तत्तापानी पासून कसोल येथील कोल डॅम पर्यंत जलपरिवहन सेवा सुरु होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment