हे दिग्गज खेळाडू 2023च्या विश्वचषक संघात नसणार?


मुंबई : भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच भारतीय संघाचा या विश्वचषकातील प्रवासही येथेच संपला. न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचे तिकीट मिळवले. भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान या विश्वचषकात देणारे काही खेळाडू पुढच्या विश्वचषकात न दिसण्याची शक्यता आहे. कारण, या खेळाडूंचे सध्याचे वय आणि युवा खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना संधी न मिळण्याचीच दाट शक्यता आहे.

भारतीय संघामध्ये या विश्वचषकात लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, केदार जाधव, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाचे योगदान देत भारताला सेमीफायनलपर्यंत नेले. भारतात 2023 च्या विश्वचषकाचे सर्व सामने होणार आहेत. विश्वचषक मायदेशात जिंकण्यासाठी भारतीय संघाला पुन्हा नव्याने बांधणी करावी लागणार आहे.

पुढच्या विश्वचषकात भारतीय संघाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये नवी ओळख मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. धोनीच्या फिटनेसवर कुणालाही शंका नसली तरी त्याचा फॉर्म पाहता तो 2023 च्या विश्वचषकात न खेळण्याचाच अंदाज आहे. पहिल्यांदा 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघाचे धोनीने प्रतिनिधित्व केले, त्यानंतर भारताला 2011 ला विजेतेपद मिळवून दिले, 2013 ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि कसोटी क्रिकेटमध्येही नंबर वन होण्याचा मान मिळवला. कर्णधार म्हणून धोनीलाच पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मानही जातो.

हा अखेरचा विश्वचषक विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचाही असण्याची शक्यता आहे. धोनी आणि रिषभ पंत हे दोन विकेटकीपर भारतीय संघात असल्यामुळे दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठीही योग्य स्थान मिळवण्यात अपयश आले. दिनेश कार्तिकला 15 वर्षांनी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाल्यानंतरही संयमी खेळी करता आली नाही. भारतीय संघ दबावात असताना तो 25 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. त्याची या विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्या 8 होती. दिनेश कार्तिकला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हिरो होण्याची संधी होती. धोनीच्या तीन महिने अगोदर म्हणजे सप्टेंबर 2004 मध्ये दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीला बॅकअप म्हणून 2007 च्या विश्वचषकात निवड झाली, पण लवकरच भारतीय संघ बाहेर पडल्यामुळे संधी मिळाली नाही. 2011 आणि 2015 च्या विश्वचषकासाठी निवड झाली नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा जागवणारा रवींद्र जाडेजा सध्या 30 वर्षांचा आहे. संधी मिळेल तेव्हा जाडेजाने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. तो क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कुठेही कमी पडत नाही. पण कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या गोलंदाजांनी भारतीय संघात त्यांचे स्थान बळकट केल्यामुळे रवींद्र जाडेजाला अनेकदा वगळावे लागले. पण पुढची काही वर्ष जाडेजाने असेच प्रदर्शन केल्यास त्याला विश्वचषकात खेळण्याची संधी आहे. अविस्मरणीय खेळीनतंर जाडेजाने केलेले ट्वीटही चांगलेच चर्चेत राहिले. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेन, असे तो म्हणाला.

33 वर्षीय शिखर धवनला या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीनंतर त्याला पुढच्या सामन्यात खेळता आले नाही. फिटनेसमुळे सतत आत-बाहेर आणि कामगिरीतील असातत्य यामुळे शिखर धवनलाही पुढच्या विश्वचषकाला मुकावे लागू शकते. कारण, सलामीवीर फलंदाज म्हणून मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ यांच्यासारखी नवी पिढी सज्ज झाली आहे.

या विश्वचषकात सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्याने एका सामन्यात शतकी खेळी केली, पण त्याच्या अपयशाचा आलेख चढताच होता. लोकेश राहुल अनेकदा संधी देऊनही स्वतःला सिद्ध करु शकला नाही. रिषभ पंत हा पर्याय चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघाकडे तयार आहे, तर सलामीसाठीही भारतीय संघ आता नव्या पर्यायाचा वापर केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकेश राहुलचे संघातील स्थान अडचणीत आले.

भारताला आगामी विश्वचषकाचे यजमानपद मिळाले. भारतात विश्वचषकाचे सर्व सामने होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 1987, 1996, आणि 2011 च्या विश्वचषकातील काही सामनेच भारतात झाले होते. 9 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 या काळात ही मालिका खेळवली जाईल.

Leave a Comment