
आपल्या खोडसळ स्वभावासाठी जेवढा अभिनेता रणवीर सिंह ओळखला जातो. तो तेवढाच आपल्या उदारतेसाठी देखील ओळखला जातो. याचा प्रत्यय नुकताच मँचेस्टरमध्ये आला. रविवारी मँचेस्टरच्या मैदानात भारत विरुध्द पाकिस्तान यांच्या विश्वचषकातील चुरशीचा सामना खेळला गेला. रणवीर यासाठी हजर होता. त्यावेळी त्याने भरपूर मस्ती करत भारतीय संघाला प्रोत्साहन दिले. भारताने या सामन्यात विजय मिळवीत पाकिस्तानी संघाला धुळ चारल्यामुळे मैदानातील पाकिस्तान फॅन्स निराश झाले. त्यात रणवीर सिंह त्यांचे सांत्वन करण्यासाठी पुढे आला. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
पाकच्या पराभवाने दुखी झालेल्या चाहत्याचे रणवीरकडून सांत्वन
पाकिस्तानी प्रेक्षक व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये निराश झालेला दिसतो. त्याच्या डोळ्यात पराभवानंतर अश्रू भरले होते. रणवीर त्याला पाहून त्याच्या जवळ गेला. त्याला मिठी मारली आणि सांत्वनपर चार शब्द बोलला. यावेळी पराभव झाला असला तरी पुढच्यावेळी विजय मिळेल असा दिलासा त्याने दिला. शोशा इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
