तुम्ही ऐकले आहे का ‘गर्लफ्रेंड’मधील हे गाणे


बऱ्याच दिवसांपासून तुमच्या कानी नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचे आले असेल. त्याचबरोबर आपली गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दलदेखील तुम्ही बरच काही ऐकले असेलच. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून आजवर इंट्रोव्हर्ट असणारा हा मुलगा बघतोस काय रागाने…डाव टाकलाय वाघाने, एका फटक्यात केला विषय एंड, असे म्हणत आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद अतिशय हटके अंदाजात साजरा करताना दिसत असून ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ सोशल मिडियावर बघायला मिळत आहे.

अभिनेता अमेय वाघ ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत, उपेंद्र सिधये लिखित – दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात नचिकेतची भुमिका साकारत आहे. जसराज जोशी यांनी नच्याला गर्लफ्रेंड मिळाल्याचा जल्लोष साजरे करणारे ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ हे गाणे गायले असून याचे क्षितीज पटवर्धन गीतकार आहेत, तर संगीतकार हृषीकेश–सौरभ-जसराज यांनी अतिशय हटके अंदाजात हे संगीतबद्ध केले आहे.

त्याच्या कुटुंबीयांना नचिकेतला ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद झाला असून यतीन कार्येकर, कविता लाड हे त्याचे आई – बाबा या गाण्यामध्ये त्याच्या आनंदात सहभागी होत नाचताना दिसतात. तसेच नच्याला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली ही ब्रेकिंग न्यूज ठरली असून त्याच्या या यशाचा आनंद त्याच्या ऑफिसमधील सहकारी सागर देशमुख, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे यांना सुद्धा झाल्याचे गाण्यात दिसत आहे. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment