कंबरदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी दररोज करा धनुरासन


आपल्या शरीरातील कंबरेचा भाग हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग असून, या भागाची योग्य काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. कंबर जितकी लवचिक असेल, तितकी शरीराची हालचाल अधिक उत्तम प्रकारे होऊ शकते. कंबरेप्रमाणे गुडघे हा ही शरीराचा महत्वाचा भाग असून, आपण उभे राहताना, चालताना, धावताना, किंवा इतर काही कामे करताना शरीराचा भार आपल्या पाठीवर आणि अर्थातच गुडघ्यांवर येत असतो. त्यामुळे कंबर आणि गुडघे वेदनामुक्त आणि लवचिक राहणे आवश्यक ठरते. शरीराचे हे दोन्ही महत्वपूर्ण भाग लवचिक आणि बळकट राहण्यासाठी योगसाधनेमध्ये धनुरासन नियमित करण्याचा सल्ला दिला जातो.

हे आसन करण्यासाठी जमिनीवर जाडसर सतरंजी अंथरून त्यावर पोटावर झोपावे. त्यानंतर पाय गुडघ्यातून दुमडून पाठीकडे आणावेत. दोन्ही हातांनी पायांच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करावा. टाचा पकडत असताना शरीराचा वरचा भाग कंबरेतून वर उचलावा. हे आसन पूर्णस्थितीमध्ये असताना शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसत असून, आसन पूर्ण स्थितीमध्ये असताना छाती आणि मांड्यांचा भाग जमिनीवरून वर उचलला जाऊन केवळ पोटाचा भाग जमिनीला टेकलेला असावा. हे आसन केल्यानंतर शरीराचे संतुलन नियंत्रित करण्यास अवघड होत असल्यास छातीखाली उशी ठेऊन हे आसन करण्याचा प्रयत्न करावा. जर पाय वर उचलण्यात अडचण येत असेल, किंवा हातांनी पायांच्या टाचा पकडणे कठीण वाटत असेल, तर पायांमध्ये एखादा टॉवेल अडकवून टाचांच्या ऐवजी टॉवेलच्या दोन्ही कडा हातांमध्ये पकडून पाय वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे आसन सुरुवतीला करणे कठीण वाटत असले, तरी नियमित सरावाने हे आसन सहजसाध्य होऊ शकते.

हे आसन कंबरेची लवचिकता वाढण्यास सहायक असून, त्यामुळे कंबरेचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. या आसनामुळे शरीरातील चक्रे सक्रीय होऊन मुख अधिक तेजस्वी दिसू लागते. या आसनामुळे गुडघ्याचे स्नायू बळकट होतात. पाठीच्या कण्याची लवचिकता या आसनामुळे वाढत असून, पाठीचे स्नायूही बळकट होण्यास मदत होते. या आसनामुळे छातीचे स्नायूही बळकट होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment