सई ताम्हणकर आणि अमेय वाघच्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर रिलीज


आपल्या आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अलिशा नावाची मुलगी ‘गर्लफ्रेंड’ मिळायला हवी राव! असे म्हणणाऱ्या नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ याला चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझर मधून भेटल्याचे दिसते. पण त्याची तिच ‘गर्लफ्रेंड’ होणार का? अशी उत्कंठा वाढवणारा चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नचिकेत यामध्ये सिंगल असून १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी त्याचा वाढदिवस असल्याचे दिसते, या टिझरमधून ‘गर्लफ्रेंड’ नसणे आणि ‘व्हेलेंटाईन डे’ ला बर्थडे असणे याचे दुःख नेमके काय असते हे एक सिंगल मुलगाच सांगू शकतो हे यातून दिसते.

अमेय आपल्या कुटुंबाबरोबर ‘१४ फेब्रुवारी’ला वाढदिवस साजरा करताना ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ च्या टीझरमध्ये दिसतो. मुळात वाढदिवशी आनंदी होण्यापेक्षा आपले वय वाढत आहे आणि अजूनही आपण सिंगल आहोत, या विषयीचे शल्य त्याच्या मनात दिसते. त्यात कुटुंब, मित्र, ऑफिसमधील सहकारी आणि बॉसबरोबर असणारी त्याची केमेस्ट्री देखील इंटरेस्टिंग पद्धतीने समोर येते. सई या टीझरमध्ये अमेयला समजून घेण्याचा प्रयत्न करत त्याला “तुला कधीच गर्लफ्रेंड नव्हती?” असा प्रश्न विचारते. अमेय मधील सिंगल तरुण यामुळे अधिक भावूक होऊन तिला मुलींना माझ्यासारखे ‘गुड बॉईज’ का आवडत नाहीत याचा पाढा वाचून दाखवतो. सई आणि अमेयमध्ये नक्की काय केमिस्ट्री या चित्रपटात जुळलेली असणार यामुळे याची उत्कंठा हा टीझर वाढवतो.

उपेंद्र सिधये यांनी ‘गर्लफ्रेंड’चे लेखन, दिग्दर्शन केले असून अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह या चित्रपटात सागर देशमुख, इशा केसकर, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे, यतीन कार्येकर, कविता लाड, उदय नेने अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. अमेय आणि सई पावसात स्तब्ध थांबत एकमेकांकडे बघत मिश्कीलपणे हसताना टीझरच्या शेवटी दिसतात. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment