आता ‘भूत’ बनुन घाबरवणार विकी कौशल


अभिनेता विकी कौशल याने अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. आता तो लवकरच एका हॉरर चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘भूत’ असे आहे. विकीने एका हॉररपटात झळकणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच दिली होती. तर, आपल्या आगामी हॉररपटाची घोषणा दिग्दर्शक करण जोहरनेही केली होती. विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांची या चित्रपटात वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.


आत्तापर्यंत ‘मसान’, ‘संजू’, ‘राजी’, ‘मनमर्जिया’ आणि उरी’ या चित्रपटात विकीने भूमिका साकारल्या आहेत. तो ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्येही झळकला. ‘उरी’ चित्रपटाच्या यशानंतर त्याचे आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान निर्माण झाले आहे. तो आता पहिल्यांदाच हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘भूत’ चित्रपटाचे पोस्टर त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याने या पोस्टरला भीतीच्या जगात हरवून जा’ ( डर की दुनिया मे खो जाओ), असे कॅप्शन दिले आहे.

शशांक खेतान आणि करण जोहर मिळून हा चित्रपट तयार करणार आहेत. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग हे करणार आहेत. आता विकीला भूताच्या रूपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Leave a Comment